मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात, राहुल गांधींचा निशाणा

Foto
नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादलेले आहे. तसेच टॅरिफ वाढवण्याचा इशाराही देत आहेत. शांततेचा नोबेल मिळावा, यासाठी अधीर झालेले ट्रम्प भारताबाबतही मोठे दावे करत होते आणि आजही करत आहेत. ऑपरेशन सिंदूर ते रशियाकडून तेल खरेदीबाबत डोनाल्ड ट्रम्प परस्पर विधाने करत आहेत. यावर भारत उत्तर देत असला तरी ट्रम्प सातत्याने तेच दावे करताना दिसत आहेत. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वैयक्तिकरित्या याबाबत आश्‍वासन दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. भारत सरकारने ट्रम्प यांच्या विधानाची पुष्टी केलेली नाही. युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव आणण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यामुळे बळकटी मिळेल, असे म्हटले जात आहे. हाच धागा पकडून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात

राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधताना 5 घटनांचा दाखला दिला आहे. 
1. ट्रम्प यांना भारत रशियन तेल खरेदी करणार नाही, हे ठरवण्याची आणि जाहीर करण्याची परवानगी देणे.
2. वारंवार नकार देऊनही अभिनंदन संदेश पाठवत राहणे.
3. अर्थमंत्र्यांचा अमेरिका दौरा रद्द करणे.
4. इजिप्त दौरा रद्द करणे.
5. ऑपरेशन सिंदूरवर त्यांच्या मताचे खंडन करत नाही.
पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

दरम्यान, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे भारताचे आश्‍वासन हे एक महत्त्वाचे वळण ठरू शकते. युक्रेन युद्ध सुरू असताना रशियाच्या तेल उत्पन्नात कपात करण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून अधिक तीव्र करण्यात येत आहेत. चीननंतर भारत हा रशियन तेलाचा दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार आहे. ट्रम्प म्हणाले की, भारत शिपमेंट ताबडतोब थांबवू शकत नाही, ही थोडी प्रक्रिया आहे, परंतु ती लवकरच पूर्ण होईल.

ठाकरे गटाचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेल खरेदी थांबण्याचा शब्द दिल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या दबावाखाली काम करत आहेत. मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठीच काम करत आहेत असे वाटते